एका वडाची परवड ....

एका वडाची परवड ....
     
      कधी कधी मातीची खूप आठवण येऊ लागलीना कि मग मी भारताचा नकाशा desktop ला लावतो आणि मनभरून google earth वरती झूम करत करत माझ्या आईच दर्शन घेतो.अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला माझा  विशाल भारत डोळ्यात बसवताना त्याच्या महानतेची प्रचीती येते.केवढा आपला देश आपण किती नशीबवान आहोत कारण आपण इथ आहोत.बघा न जगातली सारी वातावारणे एका नकाशात पाहायला मिळतात.वाळवंटही आहे हिमशिखरे देखील  आहेत, खेडी आहेत शहरे हि आहेत,नद्य,तलाव जंगले अरण्ये...अन कित्ती काय.भारताची आठवण आली म्हणून काही हे बोलतोय अस नाही ना दिखाऊ देशभक्तीचे झंझावाती वारेही माझ्या डोक्यात शिरले आहे असेही नाही जे कि घोषणा देऊन व एखाद्याला धमकावून माझ मन अभिमानाने भरून येयील असं देखील अजिबात नाही.हल्ली बातम्यांमध्ये पाहून काळतच आहे भारत महान आहे तितकाच इथल्या काही लोकांचा मेंदू लहान आहे जे काही संकुचित विचारांना मोठ करून संपूर्ण भारतीयत्वाचे झेंडे मिरवताना दिसतात.जाऊदे मला त्या विषयात नाही पडायचं हा तर संपूर्ण भारतीयत्व म्हणजे काय ओ ?घरामध्ये एसी असला, दारात garden असलं तरी समाजात चाललेल्या तोतया गोरक्षा अभियानाला मोठ्या आवाजात  पाठींबा देत हो गाय राष्ट्रीय प्रतिक आहे म्हणत हळूच खिडकीतून केळीच्या साली प्लास्टिक पिशवीसकट रस्त्यावरच्या गायीला अर्पण करणारे चहासोबत देशभक्तीच्याही वाफा सोडतात.फक्त गायचं आहे का हो देशाच्या अस्मितेच प्रतिक?गायीची सेवा सुश्रुषा होत असेल तर आनंदच आहे पण हातात दांडकी घेऊन गळ्यात चेन आणि डोक्याला भागव गुंडाळत दंगली करणारे कसले असले गोसेवक ?माझा बाप खरा गोसेवक आहे सकाळी गायीच शेन मारून तिच्या वैरण पाण्याची सोय करतो रोज  न चुकता.हे झाल गायीच पण देशात आपण देशाच्या म्हणून कोणत्या प्रतीकच संवर्धन केलय का?
काल कुणीतर मला जुन्या कोल्हापूर पुणे महामार्गाचे सुदर फोटो पाठवले आणि  कागल-रंकाळा गाडी याच मार्गावरून धावत जाताना मला मागे पळत्या वाडांच्या झाडाची ती सुंदर एकच रांग आठवली. लहानपणापासून वडाच झाड मला भुरळ घालत आलंय, त्याची ती डेरेदार सावली आणि आकाशात उंच जाऊन पण जमिनीशी नाळ जोडली ठेवत्या त्या पारंब्या मला मोठ होण किती समर्पक आणि नम्र असावं हे शिकवत आलेत.आता मात्र तिथ चकाचक रस्ते झेलेत कुठेतरी एखादे वाडाचे झाड आहे पण ते हि बोडक.आताच्या रस्त्याला माधोमध गुलाबी घानेरीची रोपण आहे, तिची सावली तिच्याच बुडाखाली  विरून जाते.विकास म्हंटल कि हे आलच रुंदीकरणात झाडे तोडवीच लागतात अशी काही विकासनिष्ठ माणसांची हमखास वाक्य अशा वेळी येणार हे ही  निश्चित.पण देशभक्तांना वडाच झाड हे राष्ट्रीय आणि धर्मीक  प्रतिक आहे याची कधी आठवण झालेली वा “वटवृक्ष सुरक्षा दल” जेकी भगवे झेंडे घेऊन वडाची लागण करत नियमित पाणी घालत आहेत असही कधी दिसल नाही.भारतात सगळ्यात जास्त वडाची झाड असणार शहर बडोदा होत तिथ हि आता खूप विकास झालाय म्हणजे वडाचं काय झाला असेल तेही आलच असेल ध्यानात.आता माझ्या आत्याच्या गावी म्हणजे पन्हाळा रोड ला तेवढ हे सुख उपभोगायला मिळत पण त्यातही सावली बऱ्याच जागी टकली होत आहे.
वडाच एक झाड अमुक ऑक्सिजन देत ते तमुक शास्त्रात आहे हे रटाळ माहिती असलेल पुराण वाचण्यापेक्षा मी एक झाड लावायचा विचार केला आणि दोन रोप आणली होती गंमत म्हणजे दादाच लग्न अजरामर कराव अस माझ्या मनात होत.हो अजरामर कारण जर कलकत्याच्या १५०० हून जास्त बुंधे असलेल्या अन ५००० माणसाला सावली देण्याची क्षमता ठेवणार वडाच वय जर कोण विचारणार असेल तर त्याला हेच उत्तर आहे.बर हि रोप आणली आणि घरी सांगितल कि दादाच्या लग्नाची आठवण म्हणून हि रोप लावा माझी flight आहे रात्री नाहीतर मीच लावली असती म्हणून मी मार्गस्त झालो.इतर वेळी कलमी आंबा, कलमी चिकू ,नारळ ,चिंच लावणारे माझे बाबा वड लावण्यास बरंच शास्त्र अभ्यासू लागले .मोकळ्या जागेत वड लावला तर ती जमीन नापीक होईल ,बांधावर लावला तर मुळ्या रानात येतील,अन घराशेजारी तर नकोच नको घरच्या भिंतीत शिरेल आणि बरच शास्त्र अभ्यासल अन अखेरीस चर्चेचा शेवट त्या अजरामर रोपाच्या करपून जाण्यात झाला.मी म्हंटल कोल्हापूर पन्हाळा रोड वर लावलेल्या झाडांनी कधी रस्त्याच्या मधोमध पारंबी नाही टाकली,न शेजारच्या शेतात आपला विस्तार केला उलट अगदी गंगावेस ते पन्हाळा अनवाणी चालत जाण्यासही पाय गार राहतील अशी गडद सावली दिलीये.मग एका रोपाला मोठ होऊन तुमच्या घरात शिरायला किमान ८० वर्ष लागली असती तोवर घर तर खूपच मजबूत राहील असत ना ??
माझ्या घरची हि बोंब मग सरकार तर बेदारकारच! भारतात जर इंग्रजांनी नियोजित केल्या कोणत्याही रस्त्याचा अभ्यास केला तर अस दिसून येयील की ९०% रस्त्यालगत सलग वडाची लागवण आहे.त्यांना इंग्लंड मधली सुरुची झाडे का नाही लावावी वाटली बरे ? आता आपली रस्त्याची कंत्राटे बहुतांशी परदेशी कंपन्या बघतात त्यांनी ती पोपटी पानाची अन पांढऱ्या खोडाची फोटो साठी लावलेली झाडे रस्त्याचा विटाळ करत सावली राखून ठेवतात कि काय वाटत.सरकार कोणतीही ही  असली तरी दीर्घकालीन विचार करून लहान दिसणारे निर्णय घ्यावे लागतात,त्यात अशी अजून इंग्रजांची अक्कल आपल्या लोकास आलेली दिसत नाही.अहो इतर कोणत्याही झाडाहून अधिक प्राणवायू देणारा हा अक्षय वृक्ष ज्याने प्रभू रामचंद्रांना सावली दिली त्याचे हि राजरोस होणारी कत्तल बघताना कुठे जाते यांची धार्मिक देशभक्तीची ज्वलंत भावना ? वटपौर्णिमा आली कि टीव्ही वाले ओरडून याचे महत्व सांगतात रोज ७:३० जगाचे भविष्य सांगून मोकळे होतात त्यांना एवढ्या मोठ्या वाडाची कत्तल दिसलीच नाही कधी.आता एप्रिल आलाय बऱ्याच धरणातल पाणी आटलं कि यांना हुक्की येणार या नेत्याने केले इथे वृक्षारोपण त्याने तिथे हे दाखवायची पण एकदाही संपूर्ण महामार्गाचा एक सलग आढावा घेतला नाही जाणार.
भारताची खरी अस्मिता जर काय असेल तर ती म्हणजे आपली जैवविविधता आपली झाडे मग त्यात वड ,पिंपळ,उंबर,पळस ,धावडा...सारे आले.आज आपण अंगणात पण तुळस नाही पण ते पोपटी खुरटे गवत शोभा म्हणून लावतोय ज्याने फक्त कचरा होईल.पारिजातक तर काही देवळात आणि मोजक्या परसबागेत उरलेत.चाफा फक्त तो बोलेना या गाण्यात राहिलाय आपल्याच देशात आपण आपली फक्त आपली असणारी किती प्रतीके नकळत नष्ट करत आहोत याचा कधी केलाय विचार? बुके मध्ये जरी जरबेरा शोभून दिसत असला तरी सेंट मात्र चंदन आणि मोगराच लागतो न तुम्हाला ? मित्रानो माझ्या घरात झाल्या कत्तलीच मी येऊन प्रायश्चित्त नक्कीच करणार आहे ते ही एक नाही १० वड लाऊन. मला तरी या जगात बिना आशीर्वाद अमरत्व मिळवायाचा सोपा मार्ग सापडलाय.अहो ४०० वर्षापूर्वी जे ज्ञानेश्वर माऊलीना समजल ते अजून आपण का दुर्लक्षित करतो आहोत?
                  वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
                       अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
               चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
                      बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
मित्रानो आपले आईबाप गेले तर वर्तमानाचा आधार जातो पण ही वनराई गेली मात्र सावली संपते तीही तुमच्यासोबत भविष्याचीही.मला पोटात गोळा येतोय हे म्हणताना पण सरणावरती निर्जीव धड पेटवायला सजीव झाडाची कत्तल करतो आपण ,म्हणून आपण आपल्या वंशाइतक त्यांच्या वंशाचा देखील विचार करायला हवा नाहीतर हल्ली बेलपत्राविनही महाराज सत्यनारायण करतच आहेत.संपत वड असले तरी सवड देऊन बघा विचार करा त्यांच्यासोबत हरवत आहे सावली तीही अगदी कायमची.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षी ही सुस्वरे आळविती.
येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुणदोष अंगा येत.

आकाश मंडप पृथ्वी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी.

कंथाकुमंडलु देहउपचारा
जाणवितो वारा अवसरु.

हरिकथा भोजन परवडी विस्तार
करोनि प्रकार सेवूं रुची.

तुका म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणांसी.


मी कुणी फार मोठा पर्यावरणवादी नाही म्हणून तुकोबांचा दाखला देतो आणि एवढच सांगतो...”अरे मित्रा काढ सवड  ...एक तरी लावूया वड !“



                                          -अजय निंबाळकर



Comments

  1. भाऊ तुमचे लेखन आणि प्रेम जाणतो मी.उत्तम लेखणी आणि चांगले विचार

    ReplyDelete
  2. वड़ पाच ची, आता कुठ वड़नार, यक पण वड़ शिल्लक नाय। ajay you are damn good

    ReplyDelete
  3. खूपच छान लेख आहे भाई, वास्तववादी लिखाण�������������� लिहित रहा��

    ReplyDelete
  4. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा सगळा खेळ मांडलाय या बाजारू लोकांनी... निसर्गाची प्रतारणा न करताही विकास करता येतो हेच विसरलेत.. वास्तव मांडणारा लेख..अप्रतिम लेखनशैली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath