अदृश्य

अदृश्य

जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मनासारखं आकाश भेटतं, वारा भेटतो , पाणी भेटतं, आजूबाजूला झाडे भेटतात, प्राणी भेटतात,रस्ते भेटतात, इमारती, घरे, छपरे, देव, देवळे, मशिदी, चर्च , गावे,शहरे आणि त्यातल्या भरमसाठ गर्दी देखील भेटतात ..फक्त माणसे मात्र मनासारखी भेटतीलच असा मात्र नेम नाही. वर समजा भेटलाच एखादा किंवा एखादी तर याच भेटल्या वाटा त्यावरची घरे, देवळे, मशिदी, चर्च , शहरे, त्यांच्या गर्द्या अचानक जाग्या होतात आणि कालवर दुर्लक्षित केल्या त्याच माणसाला आपल अस्तित्व दाखवून ना ना प्रकारच्या साखळ दंडात पुरते लपेटून टाकतात. यात मग काही साखळ्या देवळांच्या , मशिदींच्या, चर्च ,गुरुद्वारे आदींच्या,, काही जातीच्या ,काही जमातींच्या, काही फक्त भिंतींच्या , गर्वाच्या, काही पैश्याच्या तर काही फक्त आरश्याच्या माणसाला परत त्या निर्जीव गर्दीचा एक घटक बनवून सोडतात. वर समजा तुम्ही यांचा बिमोड करू पाहिलात तर तुमचे भावनिक बाण तयारच असतात आई, बाप, भाऊ काका, मामा अशी असंख्य टोके नेम धरून तयारच असतात तुमचे हेतू उद्वस्त करून तुम्हाला आरश्यात बंदिस्त करण्यासाठी. यातून समजा कोणी डोके वर काढलेच तर त्याचा संत होतो फारच डोईजड झाला तर हे लोक त्याला मरेपर्यंत ना ना प्रकारे छळतात आणि मेल्यावर त्याच्याच नावाचा एक नवा देव करून पुढच्या पिढ्यांना नव्या दावणी तयार ठेवतात. खांद्यावर रोजच जू उचलणारा बैल रानात मोकळा सोडला तरी एखादा लाकडी ओंडका सवयीने खांद्यावर घेऊ पाहतो तसे याच गर्दीतले अनेक जन या ओझ्याला कुणी विश्वास, कुणी परंपरा, कुणी जातधर्म, कुणी खानदान, कुणी इबादत, कुणी संस्कृती अशी हजार नवे देत नव्या धाटणीच्या प्रत्येक विचारला मुजावायला सैनिकासारखा सज्ज असतात.
तरीही काही फुले या चिखलातून वाट शोधत त्याचं हक्काच आभाळ शोधत, त्यांचा मालकीचा वारा शोधत कसोशीने फुलू पाहतातच. पहिला कोंब , मग कळी आणि बघता बघता कमळाचे मोहक रूप घेऊ लागताच गर्दीचा लोट येतो आणि देठासहित खुडून घेऊन आजवर केल्या साऱ्या कष्टाच निर्माल्य करून त्यांच्याच हक्काच्या पाण्यात सोडून येतो. कोण म्हणत वाईट झाले कोण म्हणते अद्दल घडली कोण म्हणत आमच काय गेले आणि परत प्रत्येक जन आपापल्या इमारती, घरे , गल्ल्या, गावांत, गर्दीसारखी एकरूप झाल्याच भासवतात. म्हणून माणसाला मन नावाचा अवयव दृश्य लाभलेला नाही कारण मनासारखं जगायला इथ कुणालाच स्वातंत्र्य नाही. म्हणून जो तो मन मारून जगत असतो , मरत असतो, मारत असतो कित्त्येक इच्छा,अपेक्षा, स्वप्नांना अदृश्यपणे ...........
                                              -अजय


Comments

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath