पुतळा बोलला पाहिजे ....

पुतळा बोलला पाहिजे ....

चौका चौकात उभे आहेत अवघडून
काय बघ न नशीब दगडाच
जातच नाही कुजून ...!

उन,वारा,पाउस झेलतो
हागतात कावळे
फक्त रस्ता बोलतो

३६५ दिवसात २ दिवस माझे,
इतर वेळी कोण पाहतच नाही ढुंकून .
काय बघ न नशीब दगडाच
जातच नाही कुजून ...!

दोन दिवस दिमाखात
उजेड असतो काळोखात.
तेव्हाच नगारे, तेव्हाच जयघोष

इतर वेळी भेटी आम्हाला
फक्त बेवड्यांच्या,
त्या ही जातात विटंबून !
काय बघ न नशीब दगडाच
जातच नाही कुजून ...!

मग मात्र खडा पहारा
रोज ताजा हार ,निदान
२० दिवसाचा हा खेळ सारा.
आमच्या विचारांचे अचानक प्रवचन

अरे मारू नका रे त्याला !
त्याने तर २० दिवस
ओळख दिलीये नवीन
रोज अनोळखी होतो खोळंबून
काय बघ न नशीब दगडाच
जातच नाही कुजून ...!

त्याने नाक तोडलं
मला इजाच झाली नाही
त्याने हात मोडला
मला कळ आली नाही
त्यांनी चप्पल हर घातला
मला लाज आली नाही
त्यांनीच तर चेतवला माझा विचार
निर्लज्ज मानाने मीच जो
गेलो होतो विस्मरून
काय बघ न नशीब दगडाच
जातच नाही कुजून ...!

मी म्हणलो नव्हतो मला
दगडात बांधा
अवघडून गेलोय कधीचा,
गणपतीला सुटका तर आहे
आमचा हा बिनपगारी बारमाही धंदा.

मीच शिवाजी ,मीच गांधी
मीच संभाजी ,मीच टिळक, मीच लेनिन,
मीच बाबासाहेब मीच .........अरे!

पण दगड हीच माझी ओळख!

तुम्ही पुतळे बांधून
कैद केलेत विचार, संस्कार
त्याने तर सुटका केली
मी तर कुणावर राहू विसंबून !
काय बघ न नशीब दगडाच
जातच नाही कुजून ...!

 माझे ऐकाल तर
सगळे दगड एकत्र फोडा
बघा दिसतात काय शिवाजी
दिसतात काय गांधी
कि बोलतात आंबेडकर
अगदी तावून सुलाखून ...

अरे ...खरं खरं सांगा
कोण गेल विटंबून ?
?


-अजय निंबाळकर

“पुतळे बांधण्याचा मुळ हेतू विटंबन असावा बहुतेक ...
बरीच माणसं मला विटंबना झाल्यावर माहिती झालीत”

Comments

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath